About Member

Lalita Navsagar

Lalita Navsagar

Director

वेदनेतून जन्मलेली माणुसकीची ज्योत
काही कथा या केवळ शब्द नसतात… त्या संघर्ष, वेदना आणि माणुसकीच्या अश्रूंनी लिहिलेल्या असतात. सौ. ललिताताई तुकाराम नवसागर आणि मा. श्री. टी. एल. नवसागर यांच्या जीवनाची ही अशीच एक सत्यकथा आहे.
सौ. ललिताताई नवसागर यांचा जन्म कल्याण येथे झाला. त्यांचे वडील झावरु पुंजा उमाप (रा. गिरणारे-दुगाव, ता. जि. नाशिक) हे श्रीमंत श्रेष्ठी होते. परंतु ललिताताईंचा जन्म हा प्रेमळ कुटुंबात नव्हे, तर वाद आणि संघर्षाच्या भोवऱ्यात झाला. वडिलांच्या आयुष्यातील कौटुंबिक गुंतागुंतीमुळे त्यांना बालपणापासूनच सावत्रपणाचा आणि उपेक्षेचा सामना करावा लागला.
लहान वयातच त्यांनी उपासमार, तिरस्कार आणि दुर्लक्ष यांचे दुःख अनुभवले. सावत्र आईच्या छळामुळे त्यांचे बालपण वेदनांनी भरलेले होते. वडिलांचे प्रेम काय असते, मायेची सावली काय असते — हे त्यांना अनुभवायलाही मिळाले नाही. अनेकदा पोटभर अन्नही मिळत नव्हते. अशा कठीण परिस्थितीत त्यांनी जीवनाशी लढा दिला.
परंतु नियतीने त्यांच्या आयुष्यात एक नवा अध्याय लिहिला. काळाच्या ओघात त्यांच्या आयुष्यात भावेश (बबनराव) उर्फ तुकाराम लक्ष्मणराव नवसागर आले. दोघांनीही अत्यंत साध्या परिस्थितीतून संसाराची सुरुवात केली. नाशिकच्या साध्या परिसरातून संघर्ष करत त्यांनी जीवन उभे केले. भावेश नवसागर यांनी कष्टाच्या जोरावर ट्रान्सपोर्ट व्यवसाय उभा केला आणि काही काळात आर्थिक स्थैर्य मिळवले.
परंतु त्यांच्या आयुष्याला खरी दिशा देणारी घटना अजून बाकी होती…
त्यांच्या घराजवळ राहणाऱ्या एका कुटुंबात रोज कौटुंबिक कलह होत असे. त्या तणावाला कंटाळून त्या घरातील तरुण मुलाने अंबड औद्योगिक क्षेत्रातील एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने लिहिले होते — “कौटुंबिक कलहाला कंटाळून मी हा निर्णय घेत आहे… आई-बाबा मला क्षमा करा.”मी आपल्या उतरत्या वयातील जीवनात आधाराची काठी बनू शकलो नाही. मला क्षमा करावेत. एका पारड्यात तुम्ही दुसर्‍या पारड्यात पत्नी मुले..आणि मला समान पारड्यात सर्वांनाच तोलायचे होते.परंतु माझ्या पत्नीचे पारड्यात मुले असल्यामुळे ते अधिक जड वाटू लागले म्हणून मी समतोल पारडे पकडण्यास असमर्थ ठरलो.
ही वेदनादायक घटना तिथेच थांबली नाही. काही दिवसांनी त्याच घरातील वयोवृद्ध आई-वडीलही परिस्थितीला कंटाळून जवळपास असलेल्या सपना थेटर जवळील विहिरीत उडी मारून दोघांनी जीवन संपवून टाकले.
ही घटना नवसागर दांपत्याच्या हृदयाला खोलवर जखम करून गेली. त्यांच्या मनात एकच प्रश्न सतत घुमत राहिला —
“जर त्या वृद्धांना आधार देणारे एक वृद्धाश्रम असते … तर कदाचित तीन जीव वाचले असते.”
त्या दिवसापासून त्यांच्या आयुष्याचा मार्गच बदलला.
एके दिवशी भावेश नवसागर यांनी आपल्या पत्नी ललिताताईंसमोर एक संकल्पना मांडली —
“आपण निराधार, बेवारस आणि दुःखी जेष्ठ नागरिकांसाठी एक मायंच छञ हक्काचे घर उभं करूया… जिथे त्यांना मायेचा आधार मिळेल.”
ललिताताईंनी क्षणाचाही विलंब न करता या संकल्पनेला होकार दिला. त्या क्षणापासून त्यांनी स्वतःच्या सुखसोयींचा त्याग करून मानवसेवेचा मार्ग स्वीकारला.
या पवित्र विचारातून सन २०१० मध्ये “मानवसेवा केअर सेंटर” वृद्धाश्रमाची स्थापना झाली. आज या आश्रयस्थानी रस्त्यावर बेवारस अवस्थेत सापडलेले जेष्ठ नागरिक, अंध, दिव्यांग, गतिमंद आणि मनोरुग्ण व्यक्ती यांना आधार दिला जातो.
सौ. ललिताताई नवसागर  या संस्थेच्या संचालिका म्हणून कार्य करत आहेत. स्वतःच्या आयुष्यात दुःख अनुभवलेल्या या मायेनं आज शेकडो निराधारांना आईची माया दिली आहे. ज्यांना कोणी नाही, त्यांच्यासाठी त्या आई, बहीण आणि आधारवड बनल्या आहेत.
अनेक निराधार जेष्ठ नागरिकांना त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळले. काहींच्या अंतिम संस्काराची जबाबदारीही त्यांनी स्वतःच्या कुटुंबाप्रमाणे पार पाडली.
या महान मानवसेवेबद्दल त्यांना अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत —
त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर पुरस्कार (२०११),
राजमाता जिजाऊ पुरस्कार (२०१२),
रमाई जयंती महोत्सव पुरस्कार (२०१४),
बहिणाबाई पुरस्कार (२०१८),
माता जिजाऊ पुरस्कार (२०१९),
अहिल्याबाई होळकर पुरस्कार (२०२२),
विद्योत्तमा फाऊंडेशन पुरस्कार (२०२३),
सिंधुताई सकपाळ पुरस्कार (२०२४),
नवदुर्गा पुरस्कार – दैनिक दिव्य मराठी (२०२४).
आज मानवसेवा केअर सेंटर वृद्धाश्रम हे केवळ एक संस्था नाही…
ते माणुसकीचे मंदिर आहे.
समाजासाठी एक विनम्र आवाहन
ही संस्था एका व्यक्तीची नाही…
ही त्या प्रत्येक निराधार व्यक्तीची आहे ज्याला आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर मायेचा हात आणि आधाराचे छत हवे आहे.
म्हणून समाजातील सजग नागरिक, दानशूर व्यक्ती आणि सामाजिक संस्था यांनी या महान मानवसेवेच्या कार्यासाठी आपले अनमोल सहकार्य आणि योगदान देऊन या सेवाकार्यात सहभागी व्हावे, ही नम्र विनंती.
कदाचित तुमच्या एका छोट्याशा मदतीमुळे एखाद्या निराधार वृद्धाच्या आयुष्यात पुन्हा आशेचा दिवा पेटू शकतो…