Blog Details

'लाडकी बहीण' आणि 'उघड्यावरचे आई बाप"

28 Mar, 2026

'लाडकी बहीण' आणि 'उघड्यावरचे आई बाप"

'लाडकी बहीण' आणि 'उघड्यावरचा बाप' :- देवेंद्रजी, जरा इकडेही लक्ष द्या

लाडकी बहीण' आणि 'उघड्यावरचा बाप' :- देवेंद्रजी, जरा इकडेही लक्ष द्या!​सध्या सोशल मीडियावर एक मेसेज वाऱ्यासारखा फिरतोय— "लाडक्या बहिणीचा भाऊ 'देवाभाऊ' देणार मकर संक्रांतीला ३००० रुपयांची भेट!" मकर संक्रांतीचा सण गोड होईलच, पण ज्या महाराष्ट्रात बहिणीच्या खात्यात पैसे आल्यावर 'नवरोबा' ठेंगणा वाटू लागलाय आणि संसाराचे धागे फॅमिली कोर्टापर्यंत पोहोचू लागलेत, तिथे त्या घरातील वृद्धांचे काय? हा कळीचा प्रश्न आज उभा ठाकला आहे. ​एकीकडे बहिणींच्या खात्यात पैसे जमा होत असताना बँकांसमोर लांबच लांब रांगा लागत आहेत. पण दुसरीकडे, याच पैशांच्या गर्वात किंवा घरातील कलहामुळे अनेक माता-पित्यांचे उर्वरित आयुष्य वृद्धाश्रमाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. 'लाडका भाऊ' फक्त बहिणीचाच का? या निराधार वृद्धांचा 'भाऊ' शासन कधी होणार? ​वृद्धाश्रमांची व्यथा आणि सरकारची उदासीनता ​ मानवसेवा वृद्धाश्रम ही संस्था गेल्या १५ वर्षांपासून पाथर्डी शिवार नाशिक येथे कार्यरत. सध्याच्या स्थितीत ८८ निराधार व्यक्ती आश्रयास आहेत या संस्थेची साधी चौकशी करायलाही शासनाला वेळ मिळालेला नाही. आमची संस्था आर्थिक बळाअभावी संकटात आहे. वृद्धाश्रम हा काही 'बिझनेस' नाही, तर ती काळाची गरज बनली आहे. समाजातील विद्वानांना वाटते की वृद्धाश्रमात शेतकऱ्यांचे आई-वडील नसतात; पण वास्तव याच्या अगदी उलट आणि भयानक आहे. दिंडीतील 'त्या' वारकऱ्याची डोळे ओलावणारी सत्यकथा ​कालच त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या अनेक दिंड्या आमच्या मानवसेवा वृद्धाश्रमासमोरून गेल्या. त्यातील शेकडो स्त्री-पुरुष पन्नाशीच्या पुढील वयातील होते. थकलेले, वेदनांनी ग्रासलेले. काही बाबांनी औषधासाठी आमच्याकडे विचारणा केली. आमच्या डॉक्टरांनी वेदनाशामक गोळ्या दिल्या. संस्थेच्या वतीने चहा-बिस्किटांची व्यवस्था केली. तेव्हा एक बाबा ऑफिसमध्ये आले. आणि माझ्या पायावर डोकं टेकवणार तेवढ्यात, मीच त्यांचेच पाय धरले. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्यांनी एकच प्रश्न विचारला –“मला कायमस्वरूपी आश्रय मिळेल का?” जागेअभावी प्रवेश बंद असल्याचं सांगितलं…आणि त्यांनी सांगितलेली हकिकत माझ्या पायाखालची जमीन सरकवणारी होती. “सुना-मुलांची बदनामी होऊ नये म्हणून दिंडीत सहभागी व्हावं लागतं…” “दिंडीत चालताना मन हलकं होतं, सन्मानाची वागणूक मिळते, पोटाची सोय होते…” “घरी गेल्यावर मात्र पडवीत किंवा मळ्यात राहावं लागतं…”दिलं तर खायचंय नाहीतर उपाशीपोटी झोपायचं मुलांनी जमीन नावावर करून घेतली,मारहाण करून घराबाहेर हाकलून दिलं. असह्य सुनाच्या जाचामुळे,त्यांच्या भावाने आत्महत्या केली. पण गावातील विद्वानांनी असे सांगितले की,“कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या” केली असं खोटं कारण दैनिक वृत्तपत्रात छापलं.असे ते बाबा म्हणाले – “आश्रय मिळाला नाही तर माझाही तोच शेवट होईल…” "शेतकऱ्यांचे आई-वडील वृद्धाश्रमात का दिसत नाहीत? कारण मुलं आणि सुनांची बदनामी होऊ नये म्हणून आम्ही दिंडीचा आधार घेतो. गावात राहिलो तर मारहाण होते, जमिनी बळजबरीने नावावर करून घेतल्या जातात. माझ्या भावाने सुना मुलांच्या जाचाला कंटाळूनच फाशी घेतली, मला उद्या कुठेच आश्रय मिळाला नाही तर सुना-मुलांमुळे आत्महत्येस प्रवृत्त व्हावे लागेल. ​मुख्यमंत्री साहेब, आता तरी जागे व्हा! ​देवेंद्रजी, योजनांचे पैसे वाटून लाडक्या बहिणींचे प्रेम मिळत असेलही, पण ज्यांच्या कष्टावर हे राज्य उभे राहिले, ते ज्येष्ठ नागरिक आज आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहेत. 'लाडकी बहीण' योजनेचा गाजावाजा होत असताना, १५ वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या मानवसेवा वृद्धाश्रमांकडे आणि तिथल्या 'निराधार आई - बापांकडे' कोणाचे लक्ष आहे? ​आमची मागणी: • ​वृद्धाश्रमांना तातडीने शासकीय अनुदान आणि सहकार्य मिळावे. • ​केवळ कागदावर योजना न ठेवता, प्रत्यक्ष जमिनीवर वृद्धांची काय स्थिती आहे याची चौकशी व्हावी. • ​ज्या मुलांनी जमिन जायजातीनानावर करू, आई-वडिलांना घराबाहेर काढले आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी. ​प्रियदर्शी सम्राट अशोका वेल्फेअर फाऊंडेशन संचलित 'मानवसेवा वृद्धाश्रम' ज्येष्ठांच्या अस्तित्वासाठी अहोरात्र लढा देत आहे. पण शासनाच्या मदतीशिवाय हा लढा अपूर्ण आहे. मुख्यमंत्री महोदय, केवळ बहिणीच नाहीत, तर महाराष्ट्रातील हे हताश झालेले 'आई-बाप' सुद्धा तुमच्याकडे अपेक्षेने पाहत आहेत.